

पिंपरी : पावसाचे पाणी जमिनीतमुरावे, शहरातील भूजल पातळी वाढावी, यासाठी ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ यंत्रणा बसवण्यात येते. शहरात इमारत बांधताना तेथे रेनवॉटर हार्वेस्टिंग बसविण्याच्या अटीवर महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाकडून परवानगी दिली जाते. मात्र, आतापर्यंत किती इमारतींना परवानगी देताना ही यंत्रणा बसवली, याची आकडेवारी महापालिकेकडे नाही. शहरातील भूजल पातळीची तपासणी करण्याची तसदी महापालिकेने आणि भूजल सर्वेक्षण विभागाने घेतलेली नाही.

उन्हाळ्यात भूजल पातळी मोठ्या प्रमाणावर खालावते. शहरात पाणीकपात सुरू आहे. अनेक कूपनलिका (बोअरवेल) आटल्या आहेत. त्यामुळे तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. मात्र, पावसाचे पाणी मुरवून भूजल पातळी वाढवण्याबाबत उदासीनता आहे.
आधीच्या काळात छोटे-छोटे तलाव निर्माण करून त्यात पावसाचे पाणी साठविले जात असे. साठलेले पाणी जमिनीत झिरपल्याने भूजल पातळी वाढते. आता सगळीकडे सिमेंटचे काँक्रिटीकरण वाढल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत झिरपण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे रेनवॉटर हार्वेस्टिंग महत्त्वाचे आहे. राज्य सरकारने ६ जून २००७ मध्ये याबाबत अधिसूचना काढली. २००७ च्या अधिसूचनेची परिणामकारक अंमलबजावणी होत नसल्याने पुन्हा १५ जून २०१६ ला अधिसूचना काढण्यात आली. महापालिकांना काटेकोरपणे अंमलबजावणीर करण्याचे निर्देश दिले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष कायम आहे.परवानगी देताना अट, मात्र पुढे काय?
• गेल्यावर्षी सरासरी ओलांडून पाऊस झाला. रेनवॉटर हार्वेस्टिंग यंत्रणेच्या माध्यमातून पावसाचे पाणी जमिनीत न मुरता नाल्यावाटे वाहून गेले. त्यातच मोठ्या प्रमाणात झालेल्या कॉक्रिटीकरणामुळे पाण्याला जमिनीत मुरण्यास वावच नाही. याबाबत महापालिका प्रशासनाला गांभीर्य नसल्याचे समोर आले आहे.
• शहरात इमारत बांधताना ही यंत्रणा बसविण्याच्या अटीवर परवानगी दिली जाते. मात्र, आतापर्यंत किती इमारतींना परवानगी दिली याबाबत महापालिकेकडे माहिती नसल्याचे अधिकाऱ्यांनीसांगितले.
सगळीकडेच दिसते उदासीनता
पाणीटंचाईमुळे शहरात सध्या दिवसाआड पाणी दिले जात आहे. यातून नागरिकांनी आणि प्रशासनाने धडा घेण्याची गरज होती. मात्र, नागरिकांमध्येही रेनवॉटर हार्वेस्टिंगबाबत उदासीनता दिसून येत आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या इमारतींमध्येच ही यंत्रणा
महापालिकेकडून नाही करसवलत
सौर ऊर्जा, गांडूळखत प्रकल्प, होम कंपोस्टिंग, सांडपाण्याचा निचरा यातील कोणत्याही प्रकल्पाची पूर्तता केल्यास महापालिकेकडून ही इमारतींना सामान्य करात सवलत दिली जाते. मात्र, शहरात रेनवॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्या केवळ शाळांना करात सवलत दिली जात असल्याने सोसायट्यांत निरुत्साह दिसत आहे.
मुख्य इमारतीतच नाही यंत्रणा
महापालिकेच्या मुख्य इमारतीतील रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प बंद आहे पालिकेच्या नवीन इमारती आणि शाळांमध्ये प्रकल्प कार्यान्वित आहेत. मुख्य इमारतीत रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला होता. मात्र, पाणी साचत असल्याने तो बंद करण्यात आल्याची माहिती शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली