पिंपरी चिंचवड

महापुरुषांचे विचार, आजच्या समाजासाठी प्रकाशवाट

प्रबोधन पर्वानिमित्त आयोजित परिसंवादात विचारवंत, साहित्यिक आणि कलाकारांच्या तोंडून महामानवांच्या कार्याची प्रेरणादायी मांडणी

Spread the love

 

 

पिंपरी, दि. १२ एप्रिल २०२५ – क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेला समतेचा, ममतेचा आणि सर्जनशीलतेचा लढा हा केवळ इतिहासातील एक अध्याय नसून, आजच्या समाजासाठी मार्गदर्शक तारा आहे. शिक्षण, स्त्री-पुरुष समता, शेतकरी न्याय, लोककला आणि संवाद या मूल्यांद्वारे त्यांनी सामाजिक परिवर्तनाचं जे बीज पेरले, ते आजही प्रेरणादायी आहे. या महामानवांची शिकवण केवळ स्मरणात न ठेवता ती आचरणात आणणे हाच खरा आदर आणि खरी आंतरिक आदरांजली ठरेल, असा सूर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्वानिमित्त आयोजित केलेल्या परिसंवादातून उमटला.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ११ ते १६ एप्रिल २०२५ दरम्यान क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रबोधन पर्वाच्या पहिल्या दिवशी “क्रांतीसुर्य ते महासुर्य – समतेच्या क्रांतीलढ्याचा प्रवास” या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादामध्ये प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे,संदीप कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार अरूण खोरे, विचारवंत मिलिंद टिपणीस आणि साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ सहभागी झाले होते.

या कार्यक्रमास अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य (सचिव दर्जा) गोरक्ष लोखंडे, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, सह शहर अभियंता देवन्ना गट्टूवार, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता सतिश वाघमारे, क्रीडा अधिकारी अनिता केदारी,कामगार नेते गणेश भोसले,तुकाराम गायकवाड,उपअभियंता चंद्रकांत कुंभार तसेच महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

समतेचा आणि ममतेचा विचार घेऊन आपण सर्वजण एकत्र आलो आहोत, आणि प्रत्येकजण ही पुरोगामी चळवळ पुढे नेण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. महात्मा फुलेंनी या चळवळीचा पाया रचला, तर डाॅ.बाबासाहेबांनी त्यावर विचारांचे भव्य शिखर उभारले. त्यांचा लढा फक्त शिक्षणाचा नव्हता, तर समाज जागृतीचा होता. अशिक्षितांना वाचनाची गोडी लावण्याचे काम त्यांनी केले. लोककलेचा वापर करून समाजमन जागृत करण्याची पद्धत त्यांनी उभी केली. सत्यशोधकी आणि आंबेडकरी जलसे ही केवळ कलाविष्कार नव्हते, तर विचारांची आंदोलने होती. फुले आणि डाॅ.बाबासाहेब हे संतवाङ्मयाचेही अभ्यासक होते. या महापुरूषांची लोकहितवादी चळवळ लोकांपर्यंत पोहोचवण्याचे मोठे काम विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून कलावंतांनी प्रत्येक घराघरात पोहोचविण्याचे काम केले आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ यांनी व्यक्त केले.

ज्येष्ठ पत्रकार अरूण खोरे यांनी नमूद केले की, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तीन प्रेरणास्तंभ होते. त्यामध्ये महात्मा बुद्ध, संत कबीर आणि महात्मा जोतीराव फुले यांचा समावेश होता. महात्मा फुलेंच्या जीवनकार्यावर आचार्य अत्रेंनी बनवलेला चित्रपट ही सामाजिक परिवर्तनाची ऐतिहासिक आठवण आहे. यात शाहिर अमर शेख, संत गाडगेबाबा, आणि सूत्रसंचालक म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील यांचा सहभाग होता. फुलेंनी सतीप्रथेविरोधात उभे राहत महिलांना तर वाचवलेच शिवाय त्यांनी ३३ मुले दत्तक घेऊन त्यांचे संगोपण देखील केले होते. त्यांच्या वाड्यावर आजही त्या मुलांची नावे आणि वीलपत्रं प्रेरणादायी स्वरूपात जतन केलेली आहेत. यामध्ये सावित्रीबाई फुलेंनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून साथ दिली. त्यांच्या स्मृतीचे राष्ट्रीय स्मारक उभारले तर ही आपल्या सामाजिक ऋणाची परिपूर्ती ठरू शकते.

ज्येष्ठ विचारवंत मिलिंद टिपणीस म्हणाले, महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहून इतिहासाचे लोकसंस्कृतीतील स्थान दृढ केले. त्यांच्यामुळे शिवजयंती उत्सव साजरा होऊ लागला. डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा चवदार तळ्याचे पाणी पिले, तेव्हा ते तळं खऱ्या अर्थाने शुद्ध झाले. महात्मा फुलेंना महात्मा ही पदवी लोकांनी दिली होती. माणूस प्रथम माणूस झाला पाहिजे, मगच महात्मा होण्यास पात्र ठरतो. ही भावना फुल्यांच्या जीवनातूनही प्रतिबिंबित होते. २१ व्या शतकातही आपण कोणत्या विचारांच्या आधारे समाज चालवतो हे समजून घेणं आवश्यक आहे.

महापुरुषांचे वाचन करताना किंवा त्यांचे कार्य ऐकताना कलाकार म्हणून नव्हे, तर माणूस म्हणून जबाबदारी वाटायला लागते. जर आपण त्यातून काही परत दिले नाही, तर केवळ अभिनय पुरेसा ठरत नाही. महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंना शिकवले, त्यांना शिक्षिका बनवले ही क्रांती होती. त्यांची दूरदृष्टी आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरते. मला ‘सत्यशोधक’ चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्या भूमिकेचा अनुभव घेता आला, ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी घटना आहे. महापुरुषांचे विचार केवळ गौरवासाठी नसून आचरणासाठी आहेत. त्यांच्या विचारांचे चिरंतन जीवन देण्याचे माध्यम जर सिनेमा ठरत असेल, तर कलाकार म्हणून हे माझं भाग्य आहे, असे सिनेअभिनेते संदीप कुलकर्णी म्हणाले.

अभिनेते मकरंद अनासपुरे म्हणाले, क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक शोषणाविरोधात आवाज उठवला, स्त्रीशक्तीचा जागर केला आणि शिवाय औद्योगिकरणाचा धोका वेळेआधीच ओळखला होता. शेतकऱ्याचा असूड या पुस्तकात त्यांनी याबाबत उल्लेख केलेला आहे. आपण भारताला भारतमाता म्हणतो, म्हणजे मातेचे स्थान देतो, मग स्त्रीला का नाही?’ महात्मा फुलेंनी समतेच्या विचारांतून हाच सर्जनशीलतेचा मार्ग लोकांना दाखवला. आज ‘संवाद’ आणि ‘संवेदना’ गायब होत चालल्या आहेत आणि ‘वाद’ व ‘वेदना’ त्यांची जागा घेत आहेत. समतेचा प्रवास सुरू ठेवायचा असेल, तर सृजनशील विचार आणि सामंजस्य वाढविणे अत्यावश्यक आहे. माणूस पैशाने नव्हे तर माणूसकीने श्रीमंत होतो, ही शिकवण आपण वागण्यात उतरवली, तरच फुले-आंबेडकरांना खऱ्या अर्थाने आजच्या पिढीने समजून घेतले असे म्हणता येईल.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी मानले. तसेच सुत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी केले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button