राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वर भालेराव यांची आज प्राणजोत मालवली


पिंपरी(लोकजागृती) :राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर भालेराव (78) यांचे आज (दि. १९ एप्रिल) सकाळी दुःखद निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खराब होती.यांच्या मागे पत्नी प्रतिभा भालेराव (माजी नगरसेविका), दोन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने पिंपरी चिंचवडच्या राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आकुर्डी गावठाण प्रभागाचे प्रतिनिधित्व करणारे ज्ञानेश्वर भालेराव हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आधारस्तंभ मानले जात होते. त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेता, दोन वेळा नगरसेवक, तसेच २००९ मध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या कार्यकाळात आकुर्डी परिसरात विविध विकासकामांना चालना मिळाली होती.आज (दि. १९) सायंकाळी ४ वाजता, निगडी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.पिंपरी चिंचवडच्या राजकारणात संयमी आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्ञानेश्वर भालेराव यांच्या निधनाने एक अनुभवी मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे