भावूक आणि जल्लोषपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांनी अनुभवला ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाचा प्रेरणादायी थरार……..
पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांशी साधला संवाद...


पिंपरी, दि. १६ जुलै २०२४ :- अजाणत्या वयात नकळतपणे ठरवलेले एक स्वप्न….ते पूर्ण करण्यासाठी ध्येयवेडा झालेले ते… परंतु, एका दुर्घटनेमुळे त्यांना आलेले अपंगत्व……त्यामुळे त्यांच्या पदरी पडलेली हतबलता… निराशेच्या गर्देतून उठून पुन्हा जिद्दीने त्यांनी केलेला ध्येयाचा पाठलाग…. देशाप्रती असणारे उच्च कोटीचे प्रेम….. आपले कर्तृत्व आत्मविश्वासाने सिद्ध करत देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर सुवर्णाक्षरांनी कोरणारे ध्येयवेडे प्रेरणादायी कथानक….. अधूनमधून टाळ्यांचा कडकडाट…..विद्यार्थ्यांचा जल्लोष…..काही क्षण शांतता…..डोळ्यांत पाणी…आणि अंगावर शहारे…अशा भावूक आणि जल्लोषपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांनी अनुभवला ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाचा प्रेरणादायी थरार……..

नैराश्यातून बाहेर पडून नव्या उमेदीने जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा संदेश देणारे पॅराऑलिंपिक सुवर्णपदक विजेते पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांचा संघर्षमयी जीवनप्रवास रेखाटणारा ‘चंदू चॅम्पियन’ हा प्रेरणादायी चित्रपट महापालिकेच्या क्रीडा प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांसह महापालिका शाळांतील इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला.
या वेळी पॅराऑलिंपिक सुवर्ण पदक विजेते पद्मश्री मुरलीकांत पेटकर, महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, मुख्याध्यापक बाबासाहेब राठोड, आदिनाथ कराड, शंकर केदार, राजू कोंढवळे, नम्रता बांदल, प्रदीप जाधव, जयराम वायळ, बुधा नाडेकर, पांडुरंग मुदगुन यांच्यासह शिक्षक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पद्मश्री पेटकर यांनी प्रत्यक्ष जगलेल्या आयुष्यातील विविध घटनांचा अंतर्भाव ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटामध्ये दर्शविण्यात आला आहे. त्यांचे कर्तृत्व, विविध खेळांमधील यशस्वी कामगिरी, देशप्रेम, लष्करी सेवेत असतानाचे विविध प्रसंग, पॅराऑलिंपिकमध्ये भाग घेतल्यानंतर विविध खेळांमध्ये केलेली चमकदार कामगिरी तसेच त्यांच्या व्यक्तीगत जीवनात घडलेल्या अनेक घटना यामध्ये पाहायला मिळतात. भारतीय सैन्यात असताना युद्धात गोळ्या लागून आलेल्या अपंगत्वावर मात करत त्यांनी मिळवलेले उत्तुंग यश चित्रपट पाहणाऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणते. दोन वर्षे कोमात असणारे आणि मृत्यूशी झुंज देत देशासाठी मनापासून काहीतरी करण्याची प्रचंड इच्छा असणारे हे पद्मश्री पेटकर यांची जिद्द पाहून मनात देशप्रेमाची ज्योत पेटते. चित्रपटातील प्रत्येक प्रसंग उत्कंठा शिगेला पोहचवतो. नात्यांतील गुंफ हळुवारपणे उलगडणारा…..प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा हा चित्रपट अगदी मनाला भावतो.
मुले ही उद्याच्या देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत. त्यांनी नैराशाच्या गर्तेत न जाता आत्मविश्वासाने येणाऱ्या अडचणींवर मात करत आपले ध्येय साध्य करावे. खेळाडूंनी जिद्दीने आपले कर्तृत्व सिद्ध करत देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल करावे. सैनिकाच्या जीवनातील संघर्ष या चित्रपटातून जगासमोर आला याचा मला विलक्षण आनंद आहे. यातून सर्वांना नक्कीच प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
प्रचंड आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर भारत देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल करणारे ध्येयवेडे पॅराऑलिंपिक सुवर्ण पदक विजेते पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांचा संघर्षमयी जीवनप्रवास चित्रपटाच्या माध्यमातून पाहताना आमच्या डोळ्यांत पाणी आले आणि अंगावर अक्षरशः शहारा उमटला. ते आम्हा विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आणि दिशा देणारे हिरो आहेत, असे भावूक उद्गार काढत महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी मानले आयुक्तांचे आभार. एका भारतीय जवानाची संघर्षगाथा पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज झळकत होते.
पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी आपल्या देशाचे नाव एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे अशा प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्वाच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी आणि आयुष्यात कधीही हार न मानता जिद्दीने आपले ध्येय गाठावे. हा चित्रपट पाहताना प्रत्यक्ष पद्मश्री पेटकर तुमच्यासमवेत आहेत यासाठी तुम्ही खूप नशीबवान आहात.