महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार राहुल महिवाल यांच्याकडे…

पिंपरी, दि. ११ जून २०२४ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह दि. २८ जून २०२४ पर्यंत अर्जित रजेवर गेले आहेत. या कालावधीत राज्य शासनाने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त राहुल महिवाल यांच्याकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. याबाबतचा स्वतंत्र आदेश महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने निर्गमित केला आहे.

आयुक्त राहुल महिवाल यांनी विभागप्रमुखांसमवेत महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आज बैठक घेऊन महापालिका कामकाजाचा आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी आषाढीवारी पालखी सोहळा, आपत्ती व्यवस्थापन, नालेसफाई तसेच इतर तातडीच्या विषयाबाबत माहिती घेऊन संबधित अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता रामदास तांबे, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, सहशहर अभियंता संजय खाबडे, ज्ञानदेव जुंधारे, प्रमोद ओंभासे, मनोज सेठिया, अजय सुर्यवंशी, उपआयुक्त विठ्ठल जोशी, मनोज लोणकर, संदीप खोत, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी उमेश ढाकणे, सीताराम बहुरे, सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, वैशाली ननावरे, विजय वायकर, संध्या वाघ, प्रेरणा सिनकर, प्रकाश कातोरे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याचे पिंपरी चिंचवड शहरात आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या कामकाजाची तसेच वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांबद्दल तपशीलवार माहिती घेतली. आषाढीवारी ही शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारी परंपरा असून पालखी सोहळ्यासाठी पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याकडे लक्ष द्यावे. हा पालखी सोहळा आनंदी आणि प्रफुल्लित वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी समन्वयाने जबाबदारी पार पाडावी, अशा सूचना राहुल महिवाल यांनी यावेळी दिल्या. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे, महापालिकेशी संबंधित तातडीच्या विषयांबाबत तात्काळ अवगत करून त्यावर वेळेत कार्यवाही करावी, नागरी सेवा पुरविताना नागरिकांच्या समस्या विचारात घेणे आवश्यक असते त्यामुळे सर्व विभागप्रमुखांनी याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.