पिंपरी चिंचवडमहाराष्ट्रराजकीय

चिखली टाळ मंदिरात जाहीर माफी मागा अन्यथा आंदोलन करणार – हभप रोहिदास महाराज मोरे

महाविकास आघाडीच्या अजित गव्हाणेंवर वारकरी सांप्रदायाचा संताप

Spread the love

पुणे, पिंपरी (दि. १२ नोव्हेंबर २०२४) टाळगाव चिखली येथील संतपीठ चा अपप्रचार करून संतपीठाच्या संचालकांचे, शिक्षक व पर्यायाने सर्व व्यवस्थेचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचे भोसरी विधानसभेचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या यंत्रणांकडून केला जात आहे. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या श्रीक्षेत्र टाळगाव चिखलीचे नाव बदनाम होत आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाच्या चिंतन समिती सदस्य व श्रीक्षेत्र टाळगाव चिखलीच्या ग्रामस्थांनी संतपीठाविषयी आत्मियतेच्या भावना नोंदवत संतपीठाचा अपप्रचार करणाऱ्यांचा जाहीर निषेध व्यक्त केला.

काही दिवसांपूर्वी भोसरीतील एका प्रचार सभेमध्ये महविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या यंत्रणांकडून आमदार आणि महायुतीचे उमदेवार महेश लांडगे यांना लक्ष्य करताना जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपिठावर व त्यांच्या संचालकांवर गंभीर आरोप केले. संतपीठावर ज्यांना संचालक केले त्यांचा इतिहास चेक करा त्यांचे कॅलिबर तुमच्या लक्षात येईल असा गंभीर आरोप केला. त्यामुळे वारकरी सांप्रदाय आणि शिक्षण क्षेत्रात तीव्र नाराजी पसरली असून त्याबद्दल निषेध व्यक्त केला जात आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या टाळाच्या प्रसादाने पुनीत झालेल्या श्री क्षेत्र टाळगाव चिखली येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या नावाने संतपीठ सुरु झाले. या संतपीठामध्ये सीबीएसई अभ्यासक्रमाबरोबर संत साहित्याचे, महाराष्ट्राच्या परंपरेचे व आपल्या भारतीय संस्कृतीचे शिक्षण इंग्रजी, मराठी, हिंदी व संस्कृत या भाषेतून शिक्षण दिले जाते. संत साहित्याचे शिक्षण देत असताना ‘ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, गाथा, अभंग, ओव्या, श्लोक तसेच हर्मोनियम, गायन, तबला, पखावज व भरतनाट्यम इ. अनेक प्रकारच्या घटकांचे शिक्षण वय वर्ष ३.५ पासून दिले जाते.

या संतपीठाचे अध्यक्षपद पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे आयुक्त भूषवित आहेत. आयुक्ताच्या बरोबरीने अतिरिक्त आयुक्त, सहाय्यक आयुक्त, शिक्षणाधिकारी, महानगर पालिकेचे लेखा व वित्त अधिकारी, महापालिकेचे कायदा सल्लागार, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे वंशज, महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष, विचारवंत जेष्ठ अर्थतज्ञ, शिक्षण तज्ञ तसेच वारकरी सांप्रदायाचे भूषण असणाऱ्या त्यागी व्यक्ती संचालक म्हणून काम करत आहेत. श्री क्षेत्र टाळगाव चिखली येथील वारकरी सांप्रदायाचा वसा व वारसा जपणारे दिग्गज कीर्तनकार मंडळी व जेष्ठ वारकऱ्यांचा चिंतन समितीमध्ये समावेश आहे.

शिवाजी महाराज चौकात आंदोलनाचा इशारा संतपीठाचा अपप्रचार केल्या कारणाने व पर्यायाने संतांचा, संत तुकोबारायांच्या वंशजांचा, संत विचारांचा व संत तुकाराम महाराजांच्या टाळाचा प्रसाद लाभलेल्या श्री क्षेत्र टाळगाव चिखली गावाचा अपमान झाल्याने सदर अपप्रचार कर्त्याने बुधवार (दि.१३ नोव्हेंबर) पर्यंत श्री क्षेत्र टाळगाव चिखली येथील टाळ मंदिरामध्ये टाळाच्या समोर जाहीर माफी मागावी अन्यथा पुढील दोन दिवसाच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वारकऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे अशी माहिती टाळगाव प्रासादिक दिंडीचे अध्यक्ष हभप रोहिदास महाराज मोरे व चिंतन समितीच्या सदस्यांनी दिली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button