डेंग्यू मुक्त पीसीएमसी अभियान
महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत “बीट डेंग्यू’ (EAT Dengue) ही संकल्पना राबविली जात आहे.

पिंपरी, दि. २० जुलै २०२४ :- डेंग्यू आजाराला आळा घालण्यासाठी महापालिकेच्या वतीने आयोजित डेंग्यू मुक्त पिंपरी चिंचवड शहर अभियानात नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि प्रत्येक आठवड्यात एक दिवस एक तास आपले घर व परिसर स्वच्छ व कोरडे ठेवण्यासाठी प्रयत्न करावे,असे आवाहन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने डेंग्यू मुक्त पिंपरी चिंचवड शहर अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत ई क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कै.अंकुशराव लांडगे सभागृहाच्या आवारात या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अभय दादेवर, उप आयुक्त राजेश आगळे,क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, प्रशासन अधिकारी नाना मोरे, वैद्यकीय विभागातील अधिकारी, महापालिकेच्या शाळांचे विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू आजाराविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करून या आजाराला आला घालणे, आपला परिसर स्वच्छ व कोरडा ठेवण्यासाठी या मोहिमेच्यामार्फत नागरिकांमध्ये संदेश पोहचवणे यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. नागरिकांनी या मोहिमेत मोठ्या संख्यने सहभागी व्हावे, असे आवाहन खोराटे यांनी केले आहे.
यावेळी उपस्थित सर्वांनी शारीरिक क्रियाकलाप करत या अभियानात सहभाग नोंदवला. तसेच उपस्थित कलाकारांनी व कर्मचाऱ्यांनी पथनाट्याद्वारे डेंग्यू बाबत जनजागृती देखील केली. यावेळी डेंग्यू बाबत जनजागृती करण्यासाठी परिसरात जनजागृती रॅली काढण्यात आली होती. यामध्ये अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नागरिकांनी आपल्या घरात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच आपला परिसर स्वच्छ ठेवावा, डेंग्यूची लक्षणे आढळल्यास तातडीने उपचार घ्यावेत, असेही ते म्हणाले
महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत “बीट डेंग्यू’ (EAT Dengue) ही संकल्पना राबविली जात आहे. Be Responsible, Educate Ourselves, Alert PCMC, Throw Away Stagnant Water ही संकल्पना राबविली जात आहे. त्यानुसार नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे मत आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी मांडले. प्रत्येक आठवड्यात वेगवेगळ्या ठिकाणी डेंग्यू मुक्त पिंपरी चिंचवड मोहीम राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले