माझी लाडकी बहिण योजना – आढावा बैठक
महिलांच्या सोयीसाठी महापालिकेच्या वतीने क्षेत्रीय स्तरावर नियोजन करण्यात आले आहे.


पिंपरी, :दि. १५ जुलै २०२४ :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी विविध तांत्रिक अडचणी निर्माण होत असून त्यासाठी बराच वेळ खर्ची होत आहे. त्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या केंद्रांवर ज्या पात्र महिलांचे अर्ज भरण्यास अडचणी निर्माण होत आहेत त्यांचे आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरून घेऊन त्यानंतर ते अर्ज क्षेत्रीय कार्यालय स्तरावर ऑनलाईन पद्धतीने भरावेत, अशा सूचना आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच महिलांच्या सोयीसाठी महापालिकेच्या वतीने क्षेत्रीय स्तरावर नियोजन करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थींना अर्ज भरणे तसेच स्विकृतीसाठी महापालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी १० जुलै २०२४ पासून शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय विविध ठिकाणी अर्जस्विकृती केंद्र उभारण्यात आले आहेत. या केंद्रांवर आवश्यक सर्व व्यवस्था करण्यात आली असून क्षेत्रीय कार्यालय स्तरावर नोडल अधिकारी म्हणून क्षेत्रीय अधिकारी हे कामकाज पाहत आहेत.
त्या अनुषंगाने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात संबधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सह शहर अभियंता बाबासाहेब गलबले, ज्ञानदेव जुंधारे, उप आयुक्त विठ्ठल जोशी, मनोज लोणकर, अण्णा बोदडे, राजेश आगळे, क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे, अमित पंडित, अजिंक्य येळे, उमेश ढाकणे, डॉ. अंकुश जाधव, सिताराम बहुरे, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, तानाजी नरळे, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी अनिता कोटलवार, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी विविध तांत्रिक अडचणी सामना करावा लागत असल्याने त्यावर योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष केंद्रांवर भेट देऊन संबंधित समस्यांचे निराकरण करून आवश्यक उपाययोजना करावी. नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी. आवश्यकता असल्यास कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी. योग्य समन्वय साधून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यात यावा. दैनंदिन कामाचा अहवाल सबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी समाज विकास विभागास वेळोवेळी सादर करावा, अशा सूचना आयुक्त सिंह यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.
महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या केंद्रांवर ज्या पात्र महिलांचे अर्ज भरण्यास अडचणी निर्माण होत आहेत त्यांचे आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरून घेऊन त्यानंतर ते अर्ज क्षेत्रीय कार्यालय स्तरावर ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येणार आहेत. अर्ज भरताना लाभार्थीच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठवला जातो जो अर्जात नमूद करणे अनिवार्य आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने एक विशिष्ठ क्रमांक तयार करण्यात येणार असून त्यावरून लाभार्थींना संपर्क करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे