पिंपरी चिंचवड

२०६, पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत जनजागृती कारण्यात आली.

निवडणूक विभागामार्फत दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर विशेष सुविधा उपलब्ध

Spread the love

 

 

अनेक दशकांपासून दापोडी येथील आनंदवन या ठिकाणी असलेल्या कुष्ठरोग वसाहतींमध्ये २०६, पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत जनजागृती कारण्यात आली.

 

“आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच आम्ही धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू.” अशी शपथ उपस्थित मतदारांनी घेऊन १०० टक्के मतदानाचा निर्धारही केला.

 

या कार्यक्रमास २०६, पिंपरी विधानसभा मतदारसंघ कार्यालयातील दिव्यांग कक्षाचे नोडल अधिकारी शरद पाटील, माध्यम कक्ष समन्वयक विजय भोजने, सहाय्यक नोडल अधिकारी बालाजी गिते , स्वीप नोडल अधिकार प्रफुल्ल पुराणिक , स्वाभिमानी महिला मंडळाच्या सुरेखा दोडमणी तसेच आनंदवन वसाहतीमधील नागरिक उपस्थित होते. येत्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे निर्देशानुसार तसेच पिंपरी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत त्याचाच भाग म्हणून आज दापोडी येथे मतदार जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला होता. अशा प्रकारचा हा या वस्तीतील पहिलाच कार्यक्रम असल्याचे तेथील मतदारांनी बोलताना सांगितले.

 

एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी मतदान जनजागृती करण्यात येत आहे. मोठया सोसायटया, शॉपिंग मॉल, उद्याने, विविध कार्यक्रम याशिवाय जेष्ठ नागरिक संघ, दिव्यांग संस्था यासह शासकीय व खाजगी वाहतूक संस्था अशा अन्य ठिकाणी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे, असे स्वीप अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी सांगितले.

अनेक वर्षांपासून आम्ही कुष्ठरोग वसाहतीमध्ये रहात असून आम्ही प्रत्येक निवडणूकीत उत्साहाने सहभाग घेत असतो. प्रत्येक निवडणूकीत आम्ही सर्व मतदार मतदान करीत असून मतदानाची टक्केवारी १०० टक्के आहे. आनंदवनमध्ये १५० पेक्षा जास्त घरे असून ३५० हून अधिक मतदार आहेत. निवडणूक विभागाकडून प्रत्येक निवडणूकीत आम्हाला व्हीलचेअर मदतनीस तसेच मतदान केंद्रावर सहकार्य मिळत असते याबद्दल निवडणूक विभागाचे आभारही आनंदवन वसाहतीमधील मतदार सुरेखा दोडमणी यांनी मानले.

 

निवडणूक विभागामार्फत दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. दिव्यांग बांधवांसाठी मतदान केंद्र तळमजल्यावर स्थापित करण्यात येणार असून त्यांचेकरीता रांग नाही तसेच त्यांना ये-जा करणे सोईस्कर व्हावे यासाठी मतदान केंद्रावर रॅम्पची सुविधा, मदतनीस तसेच त्यांचेकरिता सक्षम ऍ़पची सोय उपलब्ध आहे. अंध मतदारांसाठी ब्रेल मतपत्रिका, कर्णबधिरांसाठी दुभाषक हेल्पलाईनची सेवा उपलब्ध असेल असे दिव्यांग कक्षाचे सहाय्यक नोडल अधिकारी बालाजी गिते यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button