जनसंवाद सभा – मुख्य समन्वय अधिकारी नियुक्ती


पिंपरी, दि. १२ जुलै २०२४ :- महापालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या जनसंवाद सभेचे मुख्य समन्वय अधिकारी म्हणून उपआयुक्त रविकिरण घोडके यांची नेमणूक करण्यात आली असून ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या जनसंवाद सभेचे मुख्य समन्वय अधिकारी म्हणून कामकाज आता उपआयुक्त निलेश भदाणे पाहणार आहेत. याबाबतचे आदेश महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने निर्गमित करण्यात आले आहेत.

नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणाऱ्या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येत असते. या सभेकरीता महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय मुख्य समन्वय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
क्षेत्रीय कार्यालयाकडील जनसंवाद सभेकरीता मुख्य समन्वयक अधिकारी पदावर नियुक्त करण्यात आलेले अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असून उपआयुक्त अजय चारठाणकर यांची शासन सेवेत बदली झाली आहे. त्यामुळे उपआयुक्त रविकिरण घोडके यांची ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या जनसंवाद सभेचे मुख्य समन्वय अधिकारी म्हणून तर ह क्षेत्रीय कार्यालयाकरीता उपआयुक्त निलेश भदाणे यांची मुख्य समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.