पिंपरी चिंचवड

दिशा फाउंडेशनतर्फे प्रियांका इंगळेचा सत्कार

खडतर प्रवासानंतर यशाला गवसणी

Spread the love

 

 

पिंपरी, पुणे (दि. ११ फेब्रुवारी २०२५) लहानपणापासून मी खो-खो खेळते आहे, याचा मला खूप अभिमान आहे. खो खो मुळेच मला स्वतंत्र ओळख मिळाली, असे सांगतानाच सर्वांनी खो खो खेळाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले पाहिजे, अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय खो खो खेळाडू कु. प्रियांका इंगळे हिने व्यक्त केली.

भारतीय महिला खो खो संघाने पहिला जागतिक करंडक (वर्ल्ड कप) जिंकून आपल्या देशाची मान उंचावली आहे. पिंपरी चिंचवडची कन्या कु. प्रियांका इंगळे हिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ही कामगिरी केली. यानिमित्ताने दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने कर्तृत्ववान प्रियांकाचा खो खो खेळाचे साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी फाऊंडेशनचे उपाध्यक्ष संतोष बाबर, कोषाध्यक्ष नंदकुमार कांबळे, संचालक बाजीराव लोखंडे, अविनाश ववले, पांडुरंग लोखंडे, संतोष गवते उपस्थित होते. प्रियांकामध्ये असलेले विशेष प्राविण्य हेरून तिच्या खेळाला गती देण्याचे काम प्रशिक्षक अविनाश करवंदे यांनी केले. त्यांचाही यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना प्रियांका म्हणाली की, मला खो-खो हा खेळ लहानपणापासून आवडत होता. पाचवीत असताना शाळेच्या मैदानावरती खो-खो चा सराव मी रोज पाहत असायचे. माझ्या मनात खो-खो खेळाविषयी आवड निर्माण झाली. २००९ पासून मी खो खो खेळायला सुरुवात केली. सुरुवातीला घरच्या मंडळींचा पाठिंबा नव्हता. मुळात त्यांना खो-खो विषयीची माहितीच नव्हती. नंतर पुढे जाऊन माझी खेळाविषयी आवड व कामगिरी पाहून त्यांचे पाठबळ मिळाले. माझे मार्गदर्शक अविनाश करवंदे यांच्यामुळेच मला यश मिळू शकले. या सर्वांना माझा अभिमान वाटतो.

१४ वर्षीय गटातील सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्काराने मला गौरवण्यात आले, तो एक माझा अविस्मरणीय क्षण आहे. याशिवाय, महिला गटात राष्ट्रीय स्पर्धेत राणी लक्ष्मीबाई या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चौथ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत माझी निवड करण्यात आली. महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मला जाहीर झाला. महाराष्ट्र राज्य शासनाची गट ब राजपत्रित क्रीडा कार्यकारी अधिकारी म्हणून माझी निवड झाली, असे बरेचसे क्षण मी कधीच विसरू शकत नाही.

प्रशिक्षक करवंदे म्हणाले की, भविष्यात खो खो खेळाला सुगीचे दिवस आणायचे आहे, त्यादृष्टीने अनेक खेळाडूंचे या खेळाकडे लक्ष वेधून घ्यायचे असून त्यांना या खेळात विशेष प्राविण्य मिळवून द्यायचे आहे.

प्रास्ताविक नंदकुमार कांबळे, प्रा. प्रदीपकुमार खताळ यांनी सूत्रसंचालन आणि प्रशिक्षक अविनाश करवंदे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button