निकालानंतर मोदी पायउतार, इंडिया आघाडीचा पंतप्रधान होईल!
उद्धव ठाकरे यांचे भाकीत, संजोग वाघेरे यांच्या विजयाची खात्री!


पिंपरीः शिवसेनेकडून मावळसाठी संजोग वाघेरे यांची उमेदवारी सर्वात आधी जाहीर करण्यात आल्याचे सांगून वाघेरे यांच्या विजयाची आपल्याला ठाम खात्री असल्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सांगवीत बोलताना सांगितले. ४ जूननंतर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावरून पायउतार होतील आणि इंडिया आघाडीचा पंतप्रधान होईल, असे भाकीतही ठाकरे यांनी केले.
महाविकास आघाडीचे मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारार्थ सांगवीत आयोजित सभेत ठाकरे बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार सुप्रिया सुळे, संजय सिंह, शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन अहिर, जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, शहराध्यक्ष सचिन भोसले, प्रचारप्रमुख योगेश बाबर, राज्य संघटक एकनाथ पवार, काँग्रेसचे अध्यक्ष कैलास कदम व इतर मान्यवर उपस्थित होते. सभेला मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
ठाकरे म्हणाले, एकटा सगळ्यांना भारी, सोबत सगळे भ्रष्टाचारी अशी मोदींची अवस्था झाली आहे. मोदींकडे प्रचारासाठी कोणतेही मुद्दे राहिले नाहीत. त्यांचे भवितव्य काय राहील, हे जनतेने ठरवले आहे. प्रचारासाठी मोदी सगळीकडे जात आहेत. मात्र, त्यांचा प्रभाव पूर्णपणे ओसरला आहे. अगदीच गल्लीबोळात फिरण्याची वेळ मोदींवर आली आहे. मुंबईत तर ते रोड शोसाठी रस्त्यांवर फिरणार आहेत. मात्र. त्यांचे नाणे आता चालणार नाही. ४ जूनला निकाल लागेल, तेव्हा देशाचा पंतप्रधान बदललेला असेल, असे ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
