उद्योग विश्वमहाराष्ट्र

पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी बँकांचे सहकार्य महत्त्वाचे!

आर्थिक विकासाला पाठिंबा देण्यात महत्त्वपूर्ण पाऊल आहे

Spread the love

 

 

मुंबई (लोकजागृती): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, मुंबई येथे ‘महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाची (MSIDC)’ आढावा बैठक पार पडली. एमएसआयडीसी रस्ते आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी काम करणारी संस्था आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी 100 दिवसांच्या कार्यक्रमाकरता निर्धारित केलेले लक्ष्य एमएसआयडीसीने साध्य केले असून त्यापेक्षा 5% अधिक प्रगतीसह काम केले आहे. ही आनंदाची बाब असून यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएसआयडीसीचे कौतुक केले.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र प्रगतीशील राज्य असून राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व बँकांचे सहकार्य नेहमीच मिळत आले आहे. राज्यातील रस्त्यांची गरज लक्षात घेऊन रस्ते विकासासाठी नियोजन करण्यावर भर देण्यात येत आहे. समृद्धी महामार्गाच्या यशस्वी कामामुळे आज अनेक बँका राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना कर्ज देण्यासाठी पुढे येत आहेत, अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सुधारित HAM फेज- 1 प्रकल्प, महाराष्ट्रातील जिल्हा आणि तालुका स्तरावर रस्ते जोडणी सुधारण्यात आणि आर्थिक विकासाला पाठिंबा देण्यात महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यामध्ये महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये 6000 किलोमीटर रस्त्यांचे अपग्रेडेशन समाविष्ट आहे. या प्रकल्पांचा खर्च ₹41,730 कोटी इतका होता. सर्व बँकांच्या सहकार्याने एमएसआयडीसीमार्फत राज्याला यापैकी ₹25,875 कोटींचे अर्थसहाय्य प्राप्त झाले आहे, ही अत्यंत चांगली बाब आहे. राज्यातील पायाभूत सुविधांसाठी या वर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाची ₹1 लाख कोटींची कामे पूर्ण होतील, हे सांगताना आनंद होत आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करूनच राज्य विविध बँकांकडून नियमित कर्ज घेते आणि त्याची परतफेड करते. राज्यातील रस्ते चांगल्या दर्जाचे होण्यासाठी कोणाच्याही शिफारशीशिवाय प्रत्यक्ष गरज असलेल्या भागांमध्ये रस्ते विकासाचे नियोजन करण्यात येत आहे. सर्व बँकांनी राज्यातील पायाभूत सुविधांसाठी शासन करत असलेले नियोजन व अंमलबजावणी याची माहिती घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाच्या निधी उभारणी कार्यक्रमात सहभागी झालेल्या हुडको, एनएबीएफआयडी, आयआयएफसीएल, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, युको बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब अँड सिंध बँक, एसबीआय कॅपिटल लिमिटेड अशा सर्व वित्तीय संस्था आणि बँकांचे स्मृतिचिन्ह देऊन आभार मानले.

या बैठकीला मंत्री शिवेंद्रराजे भोसले, पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, विविध विभागांचे सचिव आणि विविध बँकाचे अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button