जपानी संस्कृती, औद्योगिक विकास अभ्यासासाठी उन्हाळी शिबिरे उपयुक्त – रेन्या किकुची
पीसीईटी आणि जपान वाणिज्य दूतावासाच्या वतीने 'जपान मधील संधी' यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन


पिंपरी, पुणे (दि. २५ ऑक्टोबर २०२४) जपान ने तंत्रज्ञानामध्ये प्रचंड प्रगती केली आहे. भारतीय विद्यार्थ्यांना जपान मधील आधुनिक तंत्रज्ञान, औद्योगिक विकास तसेच संस्कृती अभ्यासण्यासाठी शासकीय स्तरावर अनेक प्रयत्न केले जात आहेत. त्या अंतर्गत उन्हाळी शिबिरे आयोजित केली जातात. विद्यार्थ्यांना कौशल्य विकास करण्यासाठी ही उन्हाळी शिबिरे उपयुक्त आहेत असे प्रतिपादन जपानच्या एससीसीआयपीचे अध्यक्ष रेन्या किकुची यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचलित पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) आणि जपान वाणिज्य दूतावासाच्या वतीने ‘जपान मधील संधी’ यावर दोन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेचे हे तिसरे वर्ष होते. यावेळी मुंबईतील जपानच्या वाणिज्य दूतावासातील संस्कृती आणि माहिती विभागाचे अधिकारी हमुरो मेगुमी, फिडेल सॉफ्टटेकचे अध्यक्ष आणि विशेष संचालक सुनील कुलकर्णी, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, जलतापचे सदस्य हरी दामले, पीसीसीओई आंतरराष्ट्रीय संबंध विभागाच्या अधिष्ठाता डॉ. रोशनी राऊत तसेच औद्योगिक क्षेत्रातील वीस कंपन्यांचे प्रतिनिधी, पुणे, पिंपरी चिंचवड सह महाराष्ट्रातील पंढरपूर, अहिल्यानगर येथील सुमारे एक हजार सातशे विद्यार्थी सहभागी झाले होते.
पहिल्या दिवशी हमुरो मेगुमी, सुनील कुलकर्णी यांनी जपानमधील अभ्यासक्रमासाठी प्रवेश, शिष्यवृत्ती योजना, जपान मधील आयटी उद्योगातील करिअर संधी विषयी माहिती दिली.
इंडो – जॅपनीज असोसिएशनच्या वर्षा जोशी यांनी जपानी भाषेत सादरीकरण केले. स्वाती धर्माधिकारी यांनी ओरिगामी कला सादर केली. बोन्साय ग्रुपच्या अध्यक्षा डॉ. सुजाता भट यांच्या मार्गदर्शनाखाली जपानी भाषेत उत्कृष्ठ सादरीकरण केले.
दुसऱ्या दिवशी डॉ. हरी दामले, प्रोसिड टेक्नॉलॉजीचे समीर लघाटे, फुजेत्सुचे सेवा वितरण संचालक सचिन कळसे, सुरेश पाटील, थिंक स्मार्ट सिस्टीमचे संचालक सागर पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सिमिटीस्यु फॅक्टरी ऑटोमेशन ग्रुप व्यवस्थापकीय संचालक हैदर आलम, डॉ. विनायक शिंदे यांनी इंटर्नशिप, प्लेसमेंट संधी याविषयी मार्गदर्शन केले. सुत्रसंचलन डॉ. संदीप पाटील तर गीतांजली झांबरे यांनी आभार मानले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.