चिंचवड विधान सभा निवडणुकीत सत्ता बदल हवा!
"चिंचवड विधान सभेत कोणाला मिळणार तिकीट कोण मारणार बाजी"


पिंपरी : ‘महायुतीच्या जागावाटपात चिंचवड विधानसभेची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसला न दिल्यास भारतीय जनता पक्षाचे काम करणार नाही,’ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार माजी नगरसेवकांनी दिला आहे. त्यांनी आमच्यासोबत पक्षाचे २० माजी नगरसेवक असल्याचा दावाही केला आहे. त्यामुळे उमेदवारीच्या मुद्द्यावरून ‘राष्ट्रवादी’तही गटातटाचे राजकारण रंगू लागल्याचे स्पष्ट झाले आहे. लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवडच्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप विजयी झाल्या होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, प्रशांत शितोळे, मयूर कलाटे, विनोद नढे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली आहे. महायुतीच्या जागावाटपात चिंचवड मतदारसंघ भाजपला देऊ नये; तसेच मागील चार निवडणुकांत पराभूत झालेल्या चेहऱ्यांना पक्षाने पुन्हा संधी देऊ नये, अशी मागणी केली. यावरून त्यांनी अप्रत्यक्षपणे नाना काटे, राहुल कलाटे यांच्या उमेदवारीला विरोध असल्याचे दाखवले आहे.
जागा न मिळाल्यास मविआचा पर्याय दिला आहे.
शितोळे म्हणाले, ‘सध्याच्या राजकीय परिस्थितीत या मतदारसंघात अनेकांना उमेदवारीचे वेध लागले आहेत. ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाला जागा असे सूत्र ठरल्याचे सांगितले जाते. परंतु, असे काही नसते.
तोडगा काढल्यास चिंचवडची जागा राष्ट्रवादीला मिळण्यास हरकत नाही. जागा न मिळाल्यास आमच्यासमोर महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. येथे नवीन उमेदवाराला संधी मिळण्याची शक्यता आहे.’
पोटनिवडणुकीनंतर चिंचवडमधील राजकीय परिस्थिती बदलल्याचा दावा करून शितोळे म्हणाले, सध्या राजकारणात नवखे असलेलेही विधानसभेसाठी इच्छुक आहेत. आम्ही अनुभवी आणि जुने कार्यकर्ते आहोत. आमच्यासोबत जवळपास वीस माजी नगरसेवक आहेत. मागील चार निवडणुका लढविलेल्या त्याच त्या चेहऱ्यांना अपयश येत असेल तर चेहरा बदलण्याचा विचार पक्षानेही करायला हवा.