जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज महाराज आषाढीवारी पालखीचे स्वागत..


पिंपरी, दि. २९ जून २०२४ :- पावसाच्या सरींची सुंदर बरसात…कानांना सुखावणारा टाळ आणि मृदुंगाचा लयबद्ध ठेका…खांद्यावर भगव्या पताका….हाती चिपळ्या…मनात विठूरायाची ओढ….चेहऱ्यावर दिसणारा उच्च कोटीचा आनंद….आणि मुखी हरिनामाचे गोड अभंग गात भक्तिरसात चिंब भिजलेल्या….पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलेल्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांचे आगमन आज पिंपरी चिंचवड शहरात झाले. या सोहळ्याचे स्वागत शहराच्या वतीने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले. तसेच काही अंतर पालखी रथाचे सारथ्य देखील केले.

महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्राला अधिक समृद्ध करण्यासाठी संत महात्मे आणि महापुरुषांनी आपले योगदान दिले. संतांचा वारसा जतन करणारा, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा मानबिंदू असलेला हा सोहळा लौकिक अर्थाने स्वाभिमान वाढवणारा अद्वितीय महाउत्सव आहे.
श्री क्षेत्र देहू मधून पंढरपूरच्या दिशेने जगद्गुरू संत श्री. तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा प्रयाण तर श्री क्षेत्र आळंदी मधून संतश्रेष्ठ ज्ञाने श्वर महाराज यांचा पालखी सोहळा मार्गस्थ होत असतो. हे दोन्हीही पालखी सोहळे औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातून मार्गक्रमण करत पुढे जात असतात. संपूर्ण शहरवासी भक्ती रसात तल्लीन होऊन या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी आतुर असतात. दरवर्षी हा पालखी सोहळा वारीच्या स्वरुपात पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे अवघ्या वारकऱ्यांच्या समवेत हरिनामाचा गजर करत अभंग गात पायी प्रवास करत असतो. एकता, सद्भावना, आणि मानवतेचा संदेश देत वारकरी संप्रदाय भागवत धर्माची पताका घेऊन विचारांची शिदोरी सामान्य जनतेपर्यंत पोहोचवत असतो. या वारीमध्ये बळीराजाचा सहभाग अधिक प्रमाणात असतो. यंदाच्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांचे स्वागत महापालिकेच्या वतीने आज करण्यात आले.
निगडी येथील भक्ती शक्ती चौकात झालेल्या या स्वागत सोहळ्याला अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, रामदास तांबे, सहशहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे, संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, बाबासाहेब गलबले, उपआयुक्त मनोज लोणकर, संदीप खोत, अण्णा बोदडे, निलेश भदाणे, क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे, सिताराम बहुरे, उमेश ढाकणे, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, यशवंत डांगे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. अरूण दगडे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह संतपिठाचे विश्वस्त राजू महाराज ढोरे, संचालिका स्वाती मुळे आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी दिंडी प्रमुखांचा सत्कार केला.
महापालिकेच्या वतीने दिंडी प्रमुखांना कापडी पिशवी, प्रथमोपचार पेटी, संपर्क क्रमांक असलेली पुस्तिका तसेच झाडांच्या बिया, पुष्पहार आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. आषाढीवारी निमित्त वृक्षारोपण, हरीतवारी असे विविध उपक्रम देखील महापालिकेच्या वतीने राबविण्यात आले आहेत. स्वागताच्या ठिकाणी महापालिकेच्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अभंग गायनाचा कार्यक्रम सादर केला. तसेच महापालिकेच्या वतीने भक्ती-शक्ती चौक येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा वतीने ३६० डिग्री सेल्फी पॉईंट उभारण्यात आला होता. येथे भाविकांनी तसेच नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. तसेच यावर्षीही उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाच्या वतीने पालखी स्वागताच्या ठिकाणी आकर्षक अशी फुलांची सजावट करून विठ्ठल तसेच संत श्री तुकाराम महाराजांचे फुलांचे छायाचित्र रेखाटण्यात आले होते.
आषाढीवारीच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या वतीने स्थापत्य, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, सुरक्षा व्यवस्थेबरोबरच यंदाची वारी पर्यावरणपूरक, प्लास्टिक मुक्त, हरितवारी करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले होते. पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन, पालखी मुक्काम, वारकरी निवास आणि पालखी मार्गावर पुरेशा प्रमाणात शौचालयांची व्यवस्था करण्यात आली. आकुर्डी येथील विठ्ठल रुख्मिणी मंदीरामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मुक्कामासाठी विसावला. दिंड्यांच्या मुक्काम ज्या महापालिकेच्या शाळांमध्ये असतो तसेच इतर खाजगी ठिकाणी असतो तेथे महापालिकेच्या वतीने आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. पुरेसे शौचालय, स्नानगृह, पिण्याचे पाणी, महापालिकेच्या रुगणालयात मोफत वैद्यकीय सुविधा अशा आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करुन देताना प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र समन्वयकाची नेमणूक करण्यात आली आहे. पालखी सोहळ्यासोबत पिण्याच्या पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका तसेच अग्निशमन वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
पालखी मार्गावर तसेच मुक्काम आणि विसाव्याच्या ठिकाणी सॅनिटरी नॅपकीन वेंडींग व सॅनिटरी नॅपकीन बर्निंग मशीन ठेवण्यात आली आहेत. तसेच पालखी सोहळा कालावधीत वारकऱ्यांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पालखी मुक्काम, विसावा, स्वागत कक्ष आणि पालखी मार्गावर योग्य त्या ठिकाणी सी.सी.टि.व्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने ड्रोन कॅमेऱ्यांची व्यवस्थाही करण्यात आली आहे.