ग्रेडसेपरेटरच्या गंभीर चुका, वाहनचालकांच्या जीवावर
मर्ज इन-मर्ज आऊटचा फेरआढावा घेण्याची गरज


पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेने गाजावाजा करून निगडी ते दापोडी दरम्यान ग्रेडसेपरेटर सुरू केले. त्यासाठी वारेमाप खर्चही करण्यात आला. गेल्या काही वर्षांपासून या मार्गावरून वेगवान वाहतूक सुरू आहे. मात्र, ज्या हेतूने हा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. प्रत्यक्षात त्याचा अपेक्षित उपयोग होताना दिसत नाही. ग्रेडसेपरेटरच्या मूळ रचनेतच काही गंभीर चुका आहेत. त्या वाहनचालकांच्या जीवावर येऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून मर्ज इन आणि मर्ज आऊटचा फेरआढावा घेण्याची मागणी होऊ लागली आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर पिंपरी-चिंचवड शहरातून जाणारा दापोडी ते निगडी हा मोठा पल्ला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सर्विस रस्ते आहेत आणि मध्यभागी वेगवान वाहतुकीसाठी स्वतंत्र लेन ठेवण्यात आली आहे. कोणत्याही सिग्नलचा अडथळा न होता थेटपणे निगडी ते दापोडी पोहोचता येईल, अशी मूळ योजना होती. मात्र नाशिकफाटा येथील सिग्नल हटवता आला नाही.
ग्रेड सेपरेटरच्या मुख्य मार्गावर (मर्ज इन) कुठे रस्ता असावा व ग्रेड सेपरेटरमधून बाहेर जाणाऱ्या सर्विस रस्त्यावर (मर्ज आऊट) जाण्यासाठी कुठे रस्ता असावा, यावरून सुरूवातीपासून गोंधळाचे वातावरण आहे. अजूनही तीच परिस्थिती कायम आहे. अलीकडेच निगडीतील इन आणि आऊटमध्ये बदल करण्यात आले. हा त्याच गोंधळाचा परिणाम आहे.
सर्विस रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकास सिग्नल टाळायचा असल्यास त्यासाठी सिग्नलआधी मर्ज इन रस्ता असायला हवा. त्याचपध्दतीने सुलभपणे सर्विस रस्त्यासाठी बाहेर पडता यायला हवे. ग्रेड सेपरेटर संपल्यानंतर मुख्य मार्गावरून सर्विस रस्त्यावर येण्यासाठी रस्ता असावा. ग्रेड सेपरेटर वापरून सिग्नल टाळून आपल्या इच्छित स्थळी लवकरात लवकर पोहोचता आले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.
सुरुवातीच्या काळात निगडीला जाताना चिंचवडचा ग्रेट सेपरेटर संपल्यानंतर मर्ज इन होता. त्यामुळे तिथे ग्रेड सेपरेटरच्या रस्त्यावरून सर्विस रस्त्यावर जाता येत नव्हते. ज्यांना काळभोरनगरला जायचे आहे. काळभोरनगर येथील फ्लाय ओव्हर संपल्यानंतर मर्ज आऊट आहे. त्यामुळे तेथून बाहेर सर्विस रस्त्यावर जावे लागत होते. आकुर्डी सिग्नलपाशी जाऊन यू टर्न घेऊन काळभोर नगरला यावे लागत होते. यावरून बऱ्याच तक्रारी झाल्या. त्यानंतर पालिकेकडून ही चूक दुरुस्त करण्यात आली.
सद्यस्थितीत निगडीकडून नाशिकफाट्याकडे जाताना चिंचवडचा ग्रेट सेपरेटर संपल्यानंतर मर्ज आऊट असायला हवे. तेथे मर्ज इन आहे. म्हणजेच निगडीकडून येताना ज्यांना ऑटो क्लस्टरकडे जायचे आहे. त्यांना चिंचवडचा ग्रेड सेपरेटर संपल्यानंतर बाहेर पडायची सोय नाही. त्यामुळे त्यांना काळभोरनगर येथील मर्ज आऊट येथून बाहेर पडून चिंचवड स्टेशन मधील दोन्ही सिग्नल क्रॉस करून सर्विस रस्त्याने ऑटो क्लस्टरला जावे लागते. चिंचवडचा ग्रेड सेप्रेटर संपल्यानंतर मर्ज आऊट असणे गरजेचे आहे.
चिंचवडच्या एम्पायर इस्टेटमधील अथवा ऑटो क्लस्टरमधील रहिवाशांना पुण्याकडे जायचे असल्यास त्यांना पिंपरी महापालिकेच्या आधीचा ग्रेड सेप्रेटर चालू होण्याच्या आधी मर्ज इन म्हणजेच सर्विस रोड वरून ग्रेड सेपरेटर मध्ये जाण्यासाठी रस्ता असणे गरजेचे आहे. परंतु तेथे मर्ज आऊट असल्यामुळे ऑटो क्लस्टरकडून पुण्याकडे जाणाऱ्या लोकांना मोरवाडीचा सिग्नल व पिंपरी चौकातील सिग्नल असे दोन्ही सिग्नल ओलांडावे लागतात. पिंपरी ग्रेड सेप्रेटर संपल्यानंतर असलेल्या मर्ज इनद्वारे त्यांना ग्रेड सेपरेटरमध्ये प्रवेश करावा लागतो. यामुळे कारण नसताना मोरवाडी आणि पिंपरीतील सिग्नलला प्रचंड गर्दी होते. यात लोकांचा भरपूर वेळ जातो. पिंपरीतील ग्रेड सेप्रेटर संपल्यानंतर मर्ज आऊट असणे गरजेचे आहे. सध्या तिथे मर्ज इन असल्यामुळे ते चुकीचे झालेले आहे. या चुका गंभीर आहेत. त्या लवकरात लवकर दुरुस्त केल्या पाहिजे. ग्रेड सेपरेटरमधील रस्त्याचा योग्य वापर करून चांगल्या प्रकारे वाहतूक सुरळीत करता येईल. पेट्रोल- डिझेलसह वेळेची भरपूर बचत होईल.
पुढील प्रमाणे मर्ज इन आणि मर्ज आऊट करणे गरजेचे आहे, अशाप्रकारे नागरिकांचा मतप्रवाह आहे.
१. निगडीकडून नाशिकफाटाकडे जाताना चिंचवड स्टेशन येथील ग्रेडसेप्रेटर संपल्यानंतर सर्विस रोडवर जाण्यासाठी रस्ता असणे गरजेचे आहे.
२. निगडीकडून नाशिकफाटा येथे जात असताना महापालिकेचा ग्रेड सेपरेटर सुरू होण्याआधी म्हणजेच मोरवाडीच्या सिग्नलच्या आधी मर्ज इन असणे गरजेचे आहे.
३. निगडीकडून नाशिकफाटा येथे जात असताना पिंपरीतील ग्रेडसेपरेटरमधून बाहेर पडल्यानंतर खराळवाडी येथे मर्ज आऊट असायला हवे.
