अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी आज पालखी मार्गाची पाहणी करून महापालिकेच्या वतीने कामास सुरुवात
पाहणी दौऱ्यावेळी मुख्य अभियंताची हजेरी

पिंपरी, दि २१ जून २०२४ : जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील शेवटच्या टप्प्यातील कामे सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून विहीत वेळेत पुर्ण करावीत. पालखी मार्गावर तसेच मुक्कामाच्या ठिकाणी सोयी सुविधांची कमतरता राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिल्या.

जगदगुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याचे आगमन येत्या काही दिवसांत पिंपरी चिंचवड शहरात होणार आहे. त्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी आज पालखी मार्गाची पाहणी करून महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला तसेच संबंधित अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या.
आज झालेल्या पाहणीमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील निगडी येथील अण्णाभाऊ साठे स्मारक, कृष्णा मंदिर, भक्ती शक्ती चौक, मेहता हॉस्पिटल, निगडी पुलाखालील परिसर, मोरवाडी, वल्लभनगर येथील यशवंतराव चव्हाण पुतळा परिसर, खराळवाडी जनता चारकोल डेपो परिसर तसेच नाशिक फाटा येथील ठिकाणांची पाहणी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केली.
या पाहणी दौऱ्यावेळी मुख्य अभियंता रामदास तांबे, सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे, उपआयुक्त अण्णा बोदडे, निलेश भदाणे, क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे, राजेश आगळे, उमेश ढाकणे कार्यकारी अभियंता बापू गायकवाड, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या. त्यामध्ये पालखी मार्गावरील उर्वरित खड्डे तात्काळ भरण्यात यावेत, पावसाचे पाणी साचू नये यासाठी चेंबर्सचे छिद्र स्वच्छ करावेत, मार्गावर अडथळा ठरणारे अतिक्रमण हटवावेत, पालखी मार्गावर वेळोवेळी स्वच्छता राखावी, रस्ते दुभाजकांची स्वच्छता करून त्यांचे सुशोभीकरण करण्यात यावे, पालखी मार्गावरील चौकांमध्ये सुशोभीकरण करण्यात यावे, पावसात ज्या ठिकाणी पाणी साचते त्या ठिकाणची पाहणी करून पाणी साचणार नाही यासाठी आवश्यक दक्षता घ्यावी, मार्गावर अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटाव्यात, मार्गावर लटकणाऱ्या केबल्स, तारा हटविण्यात याव्यात, नियमित विद्युत पुरवठा होईल यासाठी उपाययोजना कराव्यात, पालखी मार्गावरील सर्व सीसीटीव्ही यंत्रणा सुरू असल्याची खात्री करावी, पालखी मार्गावर नेमून दिलेल्या टीम्सने समन्वय साधून सर्व महत्वाची कामे वेळेत पुर्ण करावीत तसेच या कामांचा अहवाल सादर करावा अशा सूचनांचा समावेश होता.