श्री. आबा साहेब ढवळे यांचा कृतज्ञता कार्यक्रम उत्साहात पार पडला
प्रामाणिक, सुस्वभावी,सद्गुणी आबासाहेब ढवळे


पिंपरी :सरकारी काम, जरा थांब ही सरकारी बाबूंची काम करण्याची पध्दत सर्वश्रुत आहे. मात्र, अशा नकारात्मक प्रतिमा असलेल्या अधिकारी वर्गात अपवाद ठरेल, अशी काही दुर्मिळ उदाहरणे असतात. जी सचोटीने, निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करतात आणि समाजात आपली स्वतःची ओळख निर्माण करतात.

आबासाहेब कृष्णाजी ढवळे हे असेच एक ठळक नाव आहे. पिंपरी पालिकेत कार्यकारी अभियंता म्हणून ते कार्यरत होते. नुकतेच ते सेवानिवृत्त झाले. जवळपास ३७ वर्षे ते पिंपरी पालिकेच्या सेवेत होते. या कालावधीत त्यांनी महापालिकेच्या विविध विभागांमध्ये काम केले. प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. पिंपरी-चिंचवडचे सध्याचे जे वैभवशाली आणि विकासात्मक चित्र उभे राहिले आहे, ते साकारण्यात आबासाहेबांचे महत्वाचे योगदान आहे. आबांनी आपल्या स्वभावाने अनेक माणसे जोडली. त्यामुळेच विविध क्षेत्रात त्यांचा मित्र वर्ग होता. चिंचवड-वाल्हेकरवाडी येथील आहेर लॉन्स येथे सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित स्नेह मेळाव्याला लाभलेली जवळपास हजारभर प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष देणारी होती. आमदार उमा खापरे, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, बांधकाम व्यावसायिक विजय जगताप, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी नगर सेवक शत्रुघ्न काटे,,अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील , शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते. भर पावसातही आबांना भेटण्यासाठी येणाऱ्यांचा ओघ सुरूच राहिला होता, हीच त्यांच्या कार्याची पावती होती. सदगुणी अभियंता हे आबांच्या प्रवासावर आधारित पुस्तक यावेळी प्रकाशित करण्यात आले.
आबासाहेबांचा यांचा जन्म १३ ऑगस्ट १९६६ रोजी आंबेगाव येथील कळंब या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कळंब येथे तर जुन्नरच्या कॉर्नेल स्कूलमध्ये सातवीपर्यंतचे शिक्षण झाले. शंकरराव बुट्टे पाटील माध्यमिक विद्यालयात त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढे पुण्यात इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी पदवीका प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी २ वर्ष खासगी बांधकाम व्यावसायिकांकडे काम केले. १९८७ साली ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाले. नंतर उपअभियंता व त्यानंतर कार्यकारी अभियंता म्हणून त्यांना पदोन्नती मिळाली. बांधकाम परवाना विभागात काम करत असताना ऑगस्ट २०२४ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. आबांची संपूर्ण कारकीर्द पाहता त्यांच्या कामाचा आलेख उंचावणाराच होता.
समाजासाठी झटण्याचा त्यांचा स्वभाव आणि सर्वसामान्यांना मदत करण्याची त्यांची भावना पाहता ते सेवानिवृत्तीनंतरही कार्यरत राहतील, याविषयी शंका नाही.