भविष्यात पिंपरी-चिंचवडचा हा ‘एन्ट्री पॉईंट’ राहणार आहे.
चऱ्होली परिसरात पंतप्रधान आवास योजनाप्रकल्प मार्गे


पिंपरी ।

भोसरी विधानसभा मतदार संघातील चऱ्होली गाव मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. येथील तनिष्क पार्क सोसायटी आणि प्राईड वर्ल्ड सिटीपर्यंत मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले असून, भविष्यात पिंपरी-चिंचवडचा हा ‘एन्ट्री पॉईंट’ राहणार आहे. त्यामुळे या भागात पीएमपी बस सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
चऱ्होली आणि परिसरातील सार्वजनिक प्रवासी वाहतूक सुविधा सक्षम करण्याबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी पीएमपीएमएमल ट्रॉन्सपोर्ट मॅनेजर सतीश गव्हाणे, सर्व डेपो मॅनेजर उपस्थित होते. तसेच, बैठकीनंतर तात्काळ फिल्ड व्हीजिट करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन तापकीर, पीएमपीएलचे विजयकुमार मदगे, भास्कर दहातोंडे, आमदार लांडगे यांचे स्वीय सहायक अनिकेत गायकवाड, संदेश बडिगर उपस्थित होते.
तनिष्क पार्क सोसायटी आणि प्राईड वर्ल्ड सिटी सोसायटी चऱ्होली या ठिकाणाहून महिला, विद्यार्थी व कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात प्रवास करीत आहेत. मात्र, या सध्या या ठिकाणी बस सुविधा उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच, भविष्यात हा परिसर शहरात प्रवेश करण्यासाठी प्रवेशद्वार म्हणून उदयास येणार आहे. त्यामुळे सार्वजनिक प्रवासी वाहतूक सुविधा या ठिकाणी निर्माण होण्याची आवश्यकता आहे.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये २०१७ पासून आम्ही विकासकामांचा धडाका सुरू केला. पायाभूत सोयी-सुविधा आणि विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारल्यामुळे या भागात चिखली-मोशी-चऱ्होली रेसिडेन्सिअल कॉरिडॉर निर्माण झाला आहे. लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे सार्वजनिक प्रवासी वाहतूक सुविधा त्या तुलनेत उपलब्ध करणे काळाची गरज आहे.
‘पीएमपीएमएल’ चे परिवहन व्यवस्थापक सतीश गव्हाणे म्हणाले की, आमदार महेश लांडगे यांच्या सूचनेनुसार, दिघी- आळंदी, चाकण फाटा-मोशी टोलनाका, देहू- आळंदी, चिखली रोड या मार्गांवरील बस सुविधा वाढवण्याबाबत रुट सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. तसेच, चऱ्होली परिसरात पंतप्रधान आवास योजनाप्रकल्प मार्गे प्राईड वर्ल्ड सिटी येथे नवीन पीएमपीएमएल बस सुविधा निर्माण करण्याबाबत प्रशासनाला सूचना केली आहे. नागरिकांच्या मागणीनुसार, या भागात पीएमपीएमएल बस सुविधा सुरू होईल. त्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. तसेच, समाविष्ट गावांतील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पीएमपी बसची वारंवारिता वाढण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी पुढाकार घेणार आहोत.