मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा
अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण हटवा अशा तक्रारी सूचना


पिंपरी :८जुलै २०२४ : “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी महापालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी ४१ सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. या केंद्रांवर भेट देऊन महिला लाभार्थींनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जनसंवाद सभेच्या माध्यमातून नागरिकांना करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये करण्यात येते. त्या अनुषंगाने असलेली नागरिकांची महापालिकेच्या संदर्भातील कामे, अडचणी, तक्रारी, सूचना या सर्व बाबींची नोंद घेऊन संबधितांना कार्यवाही करण्याच्या सूचना आज झालेल्या जनसंवाद सभेत देण्यात आल्या. यावेळी जनसंवाद सभेचे अध्यक्ष तथा मुख्य समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या क्षेत्रीय कार्यालयात उपस्थित राहून कामकाज पहिले.
आज झालेल्या जनसंवाद सभेत सहभागी झालेल्या नागरिकांना मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याचे तसेच या योजनेची माहिती आपल्या परिसरातील नागरिकांना देण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी जनसंवाद सभेत सहभागी झालेल्या नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे तसेच माहिती इतरांपर्यंत पोहचवण्याचे अशावसन महापालिकेला दिले.
आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी सहभाग घेऊन तक्रारवजा सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अनुक्रमे २५, ८, २, ६,२,१०, ८ आणि १२ तक्रारी वजा सूचना मांडल्या. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना नदी धरण पात्रात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे अशा सुचाना देखील यावेळी करण्यात आल्या. तर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते सुस्थितीत राहतील, नाल्यांमध्ये आणि गटारांमध्ये पाणी तुंबणार नाही याची दक्षता महापालिकेने घ्यावी, शहरात महापालिकेच्या वतीने करण्यात येणा-या विकासकामांना गती द्या. शहरातून वाहणाऱ्या नद्यांचे संवर्धन करण्यासाठी उपक्रम राबवा. अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण हटवा अशा तक्रारी सूचना जनसंवाद सभेच्या माध्यमातून नागरिकांनी केल्या.