पवना नदीच्या स्वच्छतेसाठी पर्यावरण प्रेमींनी केला संकल्प
पवना माईच्या चार घाटांवर स्वच्छता अभियानाचे नियोजन करण्यात आले.


रावेत : शहरातील सुमारे ६००पर्यावरण प्रेमींनी एकत्रित येऊन पवना नदी घाट स्वच्छता अभियान राबवून नदी स्वच्छता व पर्यावरण रक्षणाचा संकल्प दृढ केला. पावसाळ्याआधी शहराची जीवनदायिनी असलेल्या पवना माईच्या चार घाटांवर स्वच्छता अभियानाचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार ६०० पुरुष, महिला, बाल पर्यावरणप्रेमी स्वयंसेवकांनी अभियानात सहभाग घेतला.

शहरातील जाधव घाट वाल्हेकरवाडी, राममंदिर पुनावळे घाट, थेरगाव स्मशानभूमी घाट व भोंडवे मळा रावेत घाट येथे स्वच्छता अभियान राबवून ७ ट्रक ७ हजार किलो प्लास्टिक, जलपर्णी गोळा करून महापालिकेच्या माध्यमातूनत्याची विल्हेवाट लावून घाट स्वच्छ करण्यात आले. यामध्ये शहरातील पर्यावरण संरक्षण गतिविधी, सेवा विभाग, जय गगनगिरी महाराज मित्र मंडळ, चिंतामणी क्रिकेट क्लब, बेसिक फाउंडेशन, थेरगाव, निसर्ग सेवा मित्र मंडळ, मेगा पोलिस सोसायटी हिंजवडी यासह विविध नि संस्थांचे पर्यावरणप्रेमी नागरिक सहभागी झाले होते.हीच प्रेरणा कायम ठेवून हे पवनादूत भूमिकेतून प्रबोधन व सेवाकार्य करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.