झुंज’ दिवाळी विशेष अंकाचे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते शानदार प्रकाशन*
झुंज दिवाळी अंकाचे ३१व्या वर्षात पदार्पण



पिंपरी : पिंपरी चिंचवडसह महाराष्ट्रभर आपल्या धार धार लेखणीने वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या साप्ताहिक ‘झुंज’ च्या दिवाळी विशेष अंक २०२४ चे शानदार प्रकाशन पिंपरी येथील कलासागर हॉटेल मध्ये झालेल्या एका कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र युथ आयकॉन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

झुंज दिवाळी विशेष अंकाचे हे ३१ वे वर्ष असून सातत्याने समाज हिताचे लिखाण व त्यामध्ये ग्रामीण भागातील विनोदी कथा, छान लेख, कविता, खळखळून हसवणारी व्यंगचित्रे आणि नामांकित आणि दर्जेदार लेखकांचे साहित्य त्याचप्रमाणे दरवर्षी राजकीय विषयावर व चालू घडामोडीवरती सुंदर व निर्भीड असे मुखपृष्ठ ही झुंजची खासियत आहे.
प्रकाशनानंतर अंक चाळत असताना अंकाच्या दर्जाबाबत व त्यातील वात्रटिका, हास्यविनोद व व्यंगचित्रे यावरती रोहित पवार यांनी मिस्कीलपणे हास्य टिपणी केली व अंकाचे कौतुक केले. २१६ पृष्ठ असलेला बहारदार अंकाचे ३१ वे वर्ष असून पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष व साप्ताहिक झुंजचे संपादक अनिल वडघुले यांनी अतिशय परिश्रमातून हा अंक प्रकाशित केल्याने रोहित पवार यांनी कौतुक केले. यावेळी प्रजेचा विकास साप्ताहिकाचे संपादक विकास कडलक, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मा. नगरसेवक व भोसरी विधानसभेचे राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) उमेदवार अजित गव्हाणे, संतोष लांडगे, मा. नगरसेविका विश्रांती पाडळे आदी मान्यवर व सर्व पत्रकार मित्र उपस्थित होते.
“मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला आहे. पण मोबाईलचा उदय झाला आणि वाचक संख्या घसरणीला लागल्याचे दिसून येत असल्याबद्दल रोहित पवार यांनी यावेळी खंत व्यक्त करून एक तरी पुस्तक अथवा वर्तमानपत्र विकत घेऊन वाचण्याची सवय लावण्यासाठी प्रयत्न करा” असे सूतोवाच केले.