गुलिगत धोका’ म्हणत सूरज चव्हाण थेट ‘बिग बॉस मराठी सीजन 5’चा विजेता


बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा गुलिगत सूरज चव्हाण विजेता ठरला आहे.

मुंबई (लोकजागृती )– ‘बिग बॉस मराठी’च्या 16 सदस्यांचा प्रवास फक्त एका ट्रॉफीसाठीचा होता. ‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये आलेला प्रत्येक सदस्य जिंकण्याचे ध्येय घेऊन आला.सदस्य आणि प्रेक्षक सगळ्यांनाच माहिती होतं विजेता कोणी एकच असणार. संपूर्ण महाराष्ट्राने या सीझनला भरभरून प्रेम दिलं. घरातील प्रत्येक सदस्याने आपल्या पद्धतीने पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांची मने जिंकली. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये फक्त ‘बिग बॉस मराठी’ची चर्चा रंगत गेली. मग ती टास्कविषयी असो, घरात होणार्या राड्यांविषयी असो वा सदस्यांच्या दिवसागणिक बदलणार्या नात्यांविषयीची असो. ‘बिग बॉस मराठी’च्या या पर्वाचा नुकताच दिमाखात महाअंतिम सोहळा पार पडला….आणि शेवटी तो क्षण आला ज्याची संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत होता. महाराष्ट्राला ‘बिग बॉस मराठी’च्या या पर्वाचा विजेता मिळाला. महाराष्ट्राची मनं जिंकणारा सूरज चव्हाण ठरला ‘बिग बॉस मराठी’च्या या पर्वाचा विजेता. तर अभिजीत सावंतने पटकावले दुसरे स्थान. सूरजला १४ लाख ६० हजार इतकी धनराशी मिळाली आणि मानाची ट्रॉफी. तसेच पु.ना.गाडगीळ आणि सन्स लिमिटेड तर्फे दहा लाखांचे विशेष गिफ्ट आणि Tunwal E Motors limited तर्फे बाईक. महाराष्ट्राच्या लाडक्या रितेश भाऊंनी विजेत्याची घोषणा केली आहे.