भाऊसाहेब भोईरयांनी महानिर्धार मेळावा घेऊन चिंचवडमधून निवडणूक लढविण्याचा निर्धार केला.
भाजपच्या सत्ताकाळात महापालिकेची लूट झाली.


पिंपरी :चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या २००९ च्या निवडणुकीवेळी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे विधान परिषदेचे आमदार होते. काँग्रेसकडून मला उमेदवारी मिळाली असताना अचानक जगताप यांनी नेतृत्वाचा आदेश असल्याचे सांगत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे माझा पराभव झाला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी केला. पोटनिवडणुकीतही उमेदवारी नाकारली असताना, आता चिंचवड विधानसभा मतदारसंघातून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.भाऊसाहेब भोईर यांनी महानिर्धार मेळावा घेऊन चिंचवडमधून निवडणूक लढविण्याचा निर्धार केला. मेळाव्याला माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अतुल शितोळे, राजेंद्र जगताप, राजेंद्र साळुंखे, सुजित पाटील, गणेश लोंढे उपस्थित होतेभाऊसाहेब भोईर म्हणाले, की मला सातत्याने डावलण्यात आले. २०१७ मध्ये सर्वजण भाजपमध्ये जात असताना आम्ही १२ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो. असे असतानाही २०२३ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत मला उमेदवारी दिली नाही. सर्वेक्षणात माझे नाव नसल्याचे कारण दिले. नेत्यांना माझ्याबाबत कसला आकस होता, हे मला कळत नाही. २५ वर्षे नगरसेवक असताना स्थायी समितीचे अध्यक्षपद, महापौर, उपमहापौर, विषय समितीचे अध्यक्षपदही दिले नाही. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपदही दिले नाही. कुटुंबातही भांडण लावले.

भाजपच्या सत्ताकाळात महापालिकेची लूट झाली. त्यामुळे प्रत्येक नेत्याला पिंपरी- चिंचवड शहर आवडत आहे. प्रशासनाला काम करू दिले जात नाही. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असे राज्यकर्त्यांचे समीकरण बनले आहे. शहराला पाच वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. नियमित पाणी मिळत नाही. कचऱ्याचे व्यवस्थापन नाही. वाहतूक कोंडीच्या समस्येने नागरिक त्रस्त आहेत. गुन्हेगारी वाढली आहे. शहर बकाल बनले आहे. दडपशाही, झुंडशाही मोडीत काढण्यासाठी मी निवडणूक लढविणार आहे, असे भोईर म्हणाले.
उद्यापासून प्रचार सुरू करणार आहे. माझ्यासाठी सर्व पक्षांचे दरवाजे उघडे आहेत. माझ्या कार्यकर्त्यांना दम दिला, तर खपवून घेणार नाही, असा इशाराही भोईर यांनी दिली.