शहर पथ विक्रेता समिती निवडणुकीची महिला आरक्षण सोडत


पिंपरी, :- शहर पथ विक्रेता समितीमध्ये महिलांसाठी इतर मागासवर्ग गटातून १, विकलांग गटातून १ आणि सर्वसाधारण गटातून १ अशा एकूण ३ जागा राखीव ठेवण्यात आल्या असून शहर पथ विक्रेता समिती निवडणुकीची महिला आरक्षण सोडत आज निगडी येथील ग.दि. माडगुळकर नाट्यगृहात पार पडली.

अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, भूमी जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश कोळप यांच्या उपस्थितीत महिला आरक्षण सोडत पार पडली, यावेळी शहरातील विविध पथ विक्रेता संघटनांचे पदाधिकारी तसेच प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील शहर पथ विक्रेता समिती निवडणूक २०२४ होणार असून त्याअनुषंगाने सर्वसाधारण गटासाठी ३ जागा, अनुसूचित जाती गटासाठी १ जागा, अनुसूचित जमाती गटासाठी १ जागा, इतर मागास वर्ग गटासाठी १ जागा, अल्पसंख्यांक गटासाठी १ जागा आणि विकलांग गटासाठी १ जागा अशा एकूण ८ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. त्यासाठी आज सोडत चिट्टी ड्रमद्वारे चिट्टी काढुन २ जागांसाठी महिला आरक्षण सोडत घेण्यात आली तर सर्वसाधारण गटातील ३ जागांमधून १ जागा महिलांसाठी राखीव करण्यात आली .
शहर पथ विक्रेता समिती निवडणूक २०२४ बाबतच्या विविध टप्प्यांवरील प्रक्रियेबाबत वेळोवेळी वर्तमान पत्राद्वारे माहिती प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली.