

पिंपरी, दि. ७ ऑगस्ट २०२४ – शहरातील रस्त्यांवर असलेले खड्डे बुजविण्यासाठी विशेष पथकाद्वारे युद्धपातळीवर काम सुरू असून नागरिकांकडून प्राप्त झालेल्या खड्ड्यांबाबतच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी दिल्या आहेत.

शहरातील आढळून आलेल्या खड्ड्यांपैकी महापालिकेच्या वतीने आतापर्यंत सुमारे ९८९ खड्डे बुजविण्यात आले असून क्षेत्रीय कार्यालयनिहाय ८ स्वतंत्र पथकांमार्फत खड्डे बुजविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच उर्वरित खड्डे तातडीने बुजविण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. खड्डे बुजविण्यासाठी नेमलेल्या पथकाने सर्व भागांची पाहणी करून बुजविलेल्या खड्ड्यांबाबतचा दैनंदिन अहवाल सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तर कोणत्याही भागात खड्ड्यांबाबत आलेल्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्याचे निर्देश सर्व पथकांना देण्यात आलेले आहेत, अशी माहिती शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली आहे.
महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर खड्डे बुजविण्यासाठी फिरते पथके नेमण्यात आले आहेत. तसेच क्षेत्रीय अधिकारी आणि स्थापत्य कार्यकारी अभियंता यांच्या आधिपत्याखाली असलेले संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत परिसरातील रस्त्यांची पाहणी करून खड्डे बुजविण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. रस्त्यांमध्ये आढळून आलेले खड्डे बुजविणे, पाण्याचा निचरा करण्यासाठी मार्ग करून देण्याबाबतची कार्यवाही पथकांमार्फत जलदगतीने करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त, रस्त्यांवर बेकायदेशीरपणे बांधकाम साहित्य ठेवणे, अतिक्रमण करणे, राडारोडा टाकणे, रस्त्यांमध्ये बेकायदेशीरपणे खोदकाम करणे, चर खोदणे असे प्रकार आढळून आल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे, असेही शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.