कॉलराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आयुक्तांनी घेतला आढावा.


.पिंपरी, दि. १३ जून २०२४ :- कॉलरा आजाराचा संसर्ग झालेल्या तीन रुग्णांवर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे उपचार सुरु आहेत. सद्यस्थितीत तिन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत कॉलरा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्या साठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून रुग्णांच्या रहिवासी भागात सर्वेक्षण करण्यात येत आहे. या भागातील पाण्याचे नमुने महानगरपालिका तसेच शासनाच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली. नागरिकांनी पिण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी उकळून व थंड झाल्यानंतरच वापरावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

कॉलरा आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रुग्ण आढळलेल्या परिसरात महापालिकेच्या एकूण ८८ वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमार्फत तेथील रहिवासी तसेच त्यांच्या कुटुंबियांची माहिती घेऊन संशयित रुग्णांची पडताळणी करण्यात येत आहे. या सर्वेक्षणामध्ये आढळलेल्या संशयित रुग्णांचे नमूने तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या रुग्णांवर भोसरी, डी. वाय. पाटील हॉस्पिटल, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, नवीन थेरगाव रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
महापालिकेच्या वतीने रुग्ण आढळलेल्या परिसरात विविध उपाययोजना राबविण्यात येत असून सर्व जलसंजीवनीचे (ओआरएस) वाटप करण्यात येत आहे. याठिकाणी कॉलरा आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचे प्रशिक्षणही नागरिकांना देण्यात येत आहे. वैद्यकीय विभाग आणि पाणीपुरवठा विभाग यांच्यामार्फत रुग्ण आढळलेल्या परिसराचे सर्वेक्षण करण्यात येत असून विविध ठिकाणांचे पाण्याचे नमूने तपासणीकरीता पुण्यातील राज्य आरोग्य प्रयोग शाळेमध्ये पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली आहे.
दरम्यान, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील आणि विजयकुमार खोराटे यांनी आज भोसरी येथील धावडे वस्ती परिसरात रुग्ण आढळलेल्या ठिकाणी पाहणी करून सद्यपरिस्थितीची माहिती घेतली. यावेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, भोसरी रुग्णालयाचे प्रमुख शिवाजी ढगे, ऋतुजा लोखंडे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामनाथ टकले यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक उपस्थित होते. कॉलरा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. धावडे वस्ती भागात महापालिकेकडून टँकरद्वारे पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. नागरिकांनी याच पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या भागातील वितरित होणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबत असलेल्या जलवाहिन्यांची तपासणी करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्तांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. बाधित होणाऱ्या रुग्णांकडे बारकाईने लक्ष ठेऊन योग्य ते उपचार आणि उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी वैद्यकीय विभागाला दिले आहेत.
महापालिकेच्या पथकाने नवीन भोसरी रुग्णालय तसेच पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला भेट देऊन कॉलरा बाधित रुग्णांच्या तब्येतीची विचारपूस केली. या दाखल रुग्णांच्या तब्येतीवर वैद्यकीय पथकाने बारकाईने लक्ष ठेवावे, अशा सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या.
जलजन्य आजार टाळण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाची काळजी-
· भोसरीमधील धावडे वस्ती येथील नागरिकांनी महापालिकेच्या वतीने पुरविण्यात येणाऱ्या टँकरच्या पाण्याचा वापर फक्त पिण्यासाठी करावा. बोअरवेल, शुद्धीकरण न केलेल्या विहीरीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करू नये.
· शिळे किंवा उघड्यावरचे अन्न पदार्थ खाऊ नये तसेच अन्नपदार्थ व्यवस्थित झाकून ठेवावे.
· प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करावे.
. शौचास जाऊन आल्यानंतर हात साबनाने स्वच्छ धुवावेत.
· नागरिकांनी घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवावा.
· उलट्या, जुलाब, इत्यादी लक्षणे आढळल्यास वेळीच मनपाच्या नजिकच्या दवाखान्यात किंवा रुग्णालयात उपचार घ्यावेत.
· लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता योग्य ती काळजी घ्यावी.