‘रेड झोनमुक्त पिंपरी-चिंचवड’साठी पंतप्रधानांकडे पाठपुरावा करणार!
- देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन पिंपरी – ‘रेड झोनमुक्त पिंपरी-चिंचवड

पिंपरी – ‘रेड झोनमुक्त पिंपरी चिंचवड करण्यासाठी आम्ही पुन्हा संरक्षण विभाग आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोसरीत बोलताना दिली.
शिरुर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारानिमित्त भोसरीत गावजत्रा मैदानावर आयोजित सभेत फडणवीस बोलत होते.
पिंपरी-चिंचवडमधील ‘रेड झोन’चा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. अनेकदा बैठक झाली. तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनीही सकारात्मक भूमिका घेतली होती. पण, हा प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा प्रयत्न करणे गरजेचे आहे. देशात नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील आणि शिरुरमधून शिवाजीराव आढळराव पाटील हे खासदार होतील. त्यामुळे ‘रेड झोनमुक्त पिंपरी-चिंचवड’ करण्यासाठी आम्ही पुन्हा संरक्षण विभाग आणि प्रधानमंत्र्यांकडे पाठपुरावा करून आणि हा प्रश्न सोडवणार आहोत, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.
आमदार महेश लांडगे आपल्या भाषणात म्हणाले, फडणवीस यांच्या सहकार्यामुळे शहरातील शास्तीकर, उपयोगकर्ता शुक्ल, कचरा प्रक्रिया प्रकल्प, स्वतंत्र पोलीस आयुक्तालय, समाविष्ट गावांचा विकास, आंद्रा, भामा आसखेड पाणी प्रकल्प आदी ‘भोसरी व्हीजन-२०२०’मधील सर्व महत्वपूर्ण विषय मार्गी लागले. पिंपरी-चिंचवडकरांची ‘रेड झोन’ची मुक्तता करावी, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली.
आढळराव पाटील म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे २ लाख मिळकतधारक, लघु व मध्यम उद्योजक यांना दिलासा देण्यासाठी ‘रेड झोन’ हद्द कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमदार महेश लांडगे यांनी ‘रेड झोन मुक्त पिंपरी-चिंचवड’ची मागणी केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले आहे. ‘रेड झोन’चा तिढा सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
