ज्ञान प्रबोधिनी विद्यालयाच्या प्रात्यक्षिकांमुळे डोळ्याचे पारणे फिटले
विविध प्रात्यक्षिकांचे सादरीकरण


निगडी (लोकजागृती) :विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शाळांमधील क्रीडा उपक्रम महत्त्वाचा असतो. खेळाडूंनी अॅरोबिक्स, लाठी -काठी , मल्लखांब, लेझीम, कुडो, योगा, सायकलिंग, बॉल गेम्सरिदम जिम्नॅस्टिक्स, संचलन आणि बोथाठी, काठीवरून चालणे त्याचबरोबर सकाळी वॉकथॉन असा उपक्रम विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांकरता शिक्षकांसाठी होता अशा सुमारे तीन तास विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक चालू होते.

ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्राच्या तब्बल दीड हजार मुलांनी सादर केलेल्या १९ क्रीडा प्रात्यक्षिकांनी अक्षरक्षः डोळ्यांचे पारणे फिटले. निमित्त होते स्वामी विवेकानंद जयंती म्हणजेच राष्ट्रीय युवा दिनाचे निगडी ज्ञान प्रबोधिनी विद्यालयाच्या मैदानावर स्वामी विवेकानंद जयंतीच्या पूर्वसंध्येला रंगलेल्या कार्यक्रमात माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर प्रमुख पाहुणे म्हणून तर ज्ञान प्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीशराव बापट अध्यक्षस्थानी होते.
‘सावित्रीबाई’ पथकाच्या अॅरोबिक्सच्या नेत्रदीपक कवायतींनंतर कुडो मार्शल आर्टचे प्रात्यक्षिक डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले. यानंतर झालेल्या कवायतींनीही सर्वांना खिळवून ठेवले. जळती बोथाटी, भाला फिरवण्याचे प्रात्यक्षिक असो किंवा सादर केलेली लाठी कवायत, प्राचीन भारतीय खेळ कसे देखणे होते, याची साक्षच ते पटवत होते. व्यास पथकाने काठीवरून चालणे, रामदास पथकाने दोन हाती लाठी काठी फिरवत साकारलेला युद्धभूमीचा देखावा, मुलींनी मल्लखांबाच्या कवायतींमध्ये दाखवलेले कौशल्य, मनोरे, ज्युदोचे डाव, कलेरीपट्ट, सायकलिंग, बॉल गेम्स, संगीतजोडी असे विविध प्रात्यक्षिक सादर झाले.
ज्ञानप्रबोधिनी ही शिक्षण क्षेत्रात विविध प्रयोग करणारी संस्था आहे. माध्यमिक विभागाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या पाचवी आणि दहावीमधील सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवल्यामुळे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणारी शाळा ही संकल्पना संपूर्ण नव्याने या ठिकाणी विकसित केल्याची माहिती ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाचे विभाग मार्गदर्शक आदित्यदादा शिंदे यांनी दिली.
यावेळेस मा.अमित गावडे, मा. शैलजा मोरे, सचिन भैय्या लांडगे, प्राचार्य विद्या उदास, केंद्रप्रमुख मनोज देवळेकर यांनी हजेरी लावली.