दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्राची हास्यजत्रा कलाकारांशी संवाद
हास्यजत्रेने संकटकाळात सर्वांना आनंद आणि उत्तम आरोग्य दिले - प्रसाद ओक


पिंपरी, पुणे (दि. २९ एप्रिल २०२५) हास्यजत्रेने गेली सात वर्षे महाराष्ट्राला आनंद दिला, उत्तम आरोग्य दिले. संपूर्ण जगाची उलथापालथ झाली आणि प्रत्येकजण जेव्हा दु:खाच्या खाईत लोटले गेले होते. अशावेळी हास्यजत्रेने प्रत्येकाला आधार दिला. स्वच्छ व शुध्द विनोद हे हास्यजत्रेचे वैशिष्ट्य आहे. अगदी त्याचपध्दतीने ते गुलकंदच्या बाबतीत आहे, असे अभिनेते प्रसाद ओक यांनी चिंचवड येथे बोलताना सांगितले.

दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने “निमित्त गुलकंदचे, दिलखुलास गप्पा हास्यजत्रा टीमसोबत” या कार्यक्रमाचे प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ दिग्दर्शक सचिन गोस्वामी, अभिनेते प्रसाद ओक, समीर चौघुले, सई ताम्हणकर, ईशा डे, शार्विल आगटे, गायिका सावनी रवींद्र हे व्यासपीठावर उपस्थित होते. लेखक सचिन मोटे यांनी घेतलेली या सर्वांची मुलाखत उत्तरोत्तर रंगत गेली.
या कार्यक्रमात राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते ओक आणि चौघुले यांचा सत्कार करण्यात आला. ‘चंद्ररंग’चे संचालक विजय पांडुरंग जगताप यांच्या हस्ते मोटे व गोस्वामी यांचा सत्कार करण्यात आला. माजी महापौर मंगला कदम व अपर्णा डोके यांच्या हस्ते सई ताम्हणकर आणि ईशा डे यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय, टपाल खात्यातून सेवानिवृत्त झालेले दिशाचे कार्याध्यक्ष राजेंद्र करपे यांचा या सर्व मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
प्रसाद ओक म्हणाले की, कलाकाराचा रूबाब पडद्यावर असला पाहिजे. त्याबाहेर तो असता कामा नये. भूमिकेचे महत्व काय आहे, ते पाहणे गरजेचे असते. रोल किती मोठा किंवा छोटा हे फारसे महत्त्वाचे नाही.
सई ताम्हणकर म्हणाली की, कोणत्याही कलाकाराने ठराविक साच्यात अडकून राहू नये. त्याने सतत प्रयोगशील रहावे. स्वतःवर विश्वास असला पाहिजे. कामावर श्रद्धा असली पाहिजे.
सचिन गोस्वामी म्हणाले की, नाटकांच्या तुलनेत सिनेमा करणे खूप आव्हानात्मक आहे. सिनेमाची प्रक्रिया अस्वस्थ करणारी आहे. स्वतःवर विश्वास असला की आजूबाजूच्या कशाचीही भीती वाटत नाही.
सचिन मोटे म्हणाले की, नायक म्हणून समीर चौघुले यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. २९ वर्षे कठोर परिश्रम केल्यानंतर समीरला हे यश मिळाले आहे. एकांकिका, प्रहसन, नाटके, सिनेमा, लेखन अशा विविध क्षेत्रात मुशाफिरी करणारे समीर चौघुले म्हणजे हिरा आहे.
दरम्यान, काश्मीर पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करून मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमास राहूल कलाटे, सचिन साठे, पृथ्वीराज साठे, कांतीलाल गुजर, अमित गावडे, समीर मासूळकर, राजेंद्र साळुंके, बळीराम जाधव, संतोष कांबळे, राजू गोलांडे, राजू बनसोडे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
प्रास्तविक नाना शिवले यांनी केले. अक्षय मोरे यांनी सूत्रसंचालन केले. सई ताम्हणकर यांनी आभार मानले.