तुतारी नाही, कमळंच अश्विनी जगताप यांचा दावा
भारतीय जनता पक्ष कदापि सोडणार नाही असा विश्वास : अश्विनी जगताप


चिंचवड :भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार श्रीमती अश्विनीताई जगताप यांनी आज भारतीय जनता पार्टी कदापि सोडणार नाही हे सांगून पक्षावरील आपले प्रेम व पक्षावरील निष्ठा सिद्ध करून दाखवली आहे.

जिल्हाध्यक्ष शंकर भाऊ जगताप यांच्याबरोबरही कसलेही मतभेद नसल्याचे त्यांनी जाहीररीत्या सांगितले आहे. उमेदवारी बाबतीत सुद्धा पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल असे सांगून त्यांनी मीडिया मध्ये आणि सोशल मीडियामध्ये पसरवल्या जाणाऱ्या निगेटिव्ह प्रचाराला पूर्णपणे खोडून काढले आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील माजी जिल्हा उपाध्यक्ष राम वाकडकर आणि माजी नगरसेवक संदीप कस्पटे यांनी जरी आपल्या भाजप प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठी यांच्याकडे पाठविला असला तरी पक्ष नेतृत्वाने त्यांचा राजीनामा स्विकारला नाही. पक्ष नेतृत्व स्वतः त्यांच्याशी चर्चा करीत आहेत.
जिल्हाध्यक्ष शंकर भाऊ जगताप हे देखील राम वाकडकर आणि संदीप कस्पटे या दोघांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. दोघेही भाजपचेच कार्यकर्ते असल्यामुळे ही घरातलीच नाराजी आहे. जिल्हाध्यक्ष स्वतः कुटुंबाचे प्रमुख म्हणून ही नाराजी दूर करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहेत. राम वाकडकर संदीप कस्पटे आणि इतर कोणीही पक्ष सोडून जावे असे स्वतः जिल्हा अध्यक्ष आणि आमदार अश्विनीताई जगताप यांना अजिबात वाटत नाही. लवकरात लवकर भारतीय जनता पक्षाचा हा घरातीलच रुसवा फुगवा आणि जे काही समज गैरसमज असतील ते घरातल्या घरातच मिटवले जातील यासाठी पुर्ण प्रयत्न केले जातील.
पक्ष म्हणून चिंचवड विधानसभेतील भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते एकत्रितपणे पक्ष जो उमेदवार देईल त्या उमेदवाराच्या पाठीशी राहतील आणि तो उमेदवार निवडून येण्यासाठी एक दिलाने काम करतील अशा प्रकारचे वातावरण भविष्यात चिंचवड विधानसभेमध्ये निर्माण करण्यासाठी स्वतः जिल्हा अध्यक्ष शंकरभाऊ जगताप आणि आमदार अश्विनीताई जगताप हे प्राधान्याने काम करतील.
झालेल्या आरोप प्रत्यारोपांवर पक्ष प्रवक्ते म्हणून खुलासा करत असताना कदाचीत आमच्या या सहकाऱ्यांची मने देखील दुखावली गेली असतील त्याबद्दल देखील मी स्वतः दिलगिरी व्यक्त करून चिंचवड विधानसभेतील सर्व बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, आजी माजी पदाधिकारी आजी माजी नगरसेवक यांना पक्षाचा एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून विनंती करतो की चला आपण सारे पक्षासाठी एक होऊयात. मतभेद सगळे विसरून जाऊयात. मी पणा सोडून देऊयात. पक्षासाठी एक दिलाने काम करूयात. देवेंद्र फडणवीस साहेबांचे हात बळकट करूयात. महाराष्ट्रात पुन्हा आपली सत्ता आणुयात. या सत्तेत आपल्या चिंचवड, भोसरी आणि पिंपरी या तिन्ही विधानसभेचे महायुतीचे आमदार असावेत याच साठी लढूयात.
जो मोठेपणा आमदार श्रीमती अश्विनीताई जगताप यांनी दाखवला तोच मोठेपणा आपल्या पक्षासाठी आपण सर्वजण मिळून दाखवूयात एवढीच माफक अपेक्षा व्यक्त केली.